
दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२३ | कराड |
रस्त्याचे बिल काढण्यासाठी मलकापूर (ता. कराड) नगर परिषदेचा नगरअभियंता शशिकांत सुधाकर पवार (वय ३७, मूळ रा. मंद्रुळकोळे, ता.पाटण, जि.सातारा) याला व अन्य एका व्यक्तीाला ३० हजार रूपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मलकापूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी हे दुय्यम ठेकेदार असून, त्यांची फर्म आहे. फिर्यादी हे मूळ ठेकेदाराच्या फर्मअंतर्गत ठेकेदारीचे काम करतात. फिर्यादी यांनी वाखण भागातील सुनील पवार ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम केले होते. त्याचे एकूण २१ लाख ७५ हजार रुपये बिल झाले होते. त्यापैकी १५ लाख रुपये फिर्यादी यांना मिळाले होते, उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी नगरअभियंता शशिकांत पवार याने लाचेची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे लेखी रितसर तक्रार केली. या तक्रारीची अधिकार्यांनी पडताळणी केल्यानंतर सापळा लावण्यात आला. खासगी व्यक्ती सुदीप दीपक एटांबे (वय २९, रा. माऊली कॉलनी, मलकापूर, ता. कराड) याच्यामार्फत ३० हजारांची रक्कम स्वीकारली. यानंतर लाचलुचपत अधिकार्यांनी दोघांनाही अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत नलावडे, नीलेश चव्हाण, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी केली.