विहिरीत बुडून करवडीतील दोघांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। कराड । करवडी (ता. कराड) येथे विहिरीच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यात राजवर्धन किशोर पाटील (वय 22) हा वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला युवक आणि राजेंद्र दादा कोळेकर-मोरे (वय 55) हे शेतमजूर विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू पावले. एकाच गावातील या दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी गावावर शोककळा पसरली.

करवडीतील भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेतजमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली पाण्याची मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर हे दोघे दुपारच्या प्रहरी गेले होते. मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकरला पोहण्याची इच्छा झाली.

याबाबत राजवर्धनने मोबाईलवरून वडिलांना तशी कल्पना दिली. यावर दुपारची वेळ असल्याने विहिरीत उतरू नका असे किशोर पाटील यांनी सुनावले. परंतु, दरम्यान, पंधरा त वीस मिनिटांतच किशोर पाटील यांनी राजवर्धन आणि राजेंद्रला घरी येण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला. मात्र, तो उचलला गेला नाही त्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले.

विहिरीशेजारी या दोघांची कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना तातडीने बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज नसल्यामुळे आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही.

शेवटी कराडमधील मासेमारी करणार्‍या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर यांचे मृतदेह बाहेर काढले. राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी विहिरीत उतरले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, कराड ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!