स्थैर्य, खटाव, दि. 24 : निमसोड येथील एकाच कुटुंबातील पिता-पुञांचा करोना तपासणी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने निमसोडसह परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निमसोड (ता.खटाव) येथील मूळ निवासी असणारे व सद्या रंगकाम व्यवसायानिमित्ताने मुंबई वाशी असलेले एकाच कुटुंबातील चौघे जण रविवारी निमसोड येथे एका खाजगी वाहनाने आले होते. ते आल्यानंतर त्यांना येथील सिद्धन्नाथ हायस्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. त्यामधील एकाला सोमवारी ताप व इतर कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने या सर्वांना 19 रोजी सातारा येथे रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील वडील (वय-45) व मुलगा (वय-20) व एकाच कुटुंबातील दोघा पिता-पुञांचे करोना अहवाल गुरुवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले असून निमसोडला जोडणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. निमसोड परिसरातील 25 गावांमध्ये सुमारे साडेचार हजार मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून लोक आले आहेत. हायस्कूलमध्ये 11 व प्रााथमिक शाळेत 9 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. गावातील 258 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ.अर्चना पाटील, तालुका वैद्यकिय अघिकारी डॉ.युनुस शेख, वैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष मोरे आदींनी भेट देवून मार्गदर्शक सूचना दिल्या.
निमसोडला जोडणार्या अंबवडे, शिरसवडी,होळीचगांव, म्हासूर्णे,मोराळे गावांसह सर्व मळ्यांना जोडणारे रस्ते सीलबंद करण्यात आले असून जंतुनाशक फवारणीसह संपूर्ण बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवण्यात आली आहे. आरोग्य दक्षता कमिटामार्फत काळजी घेतली जात आहे.-सौ. भारतू डगे, सरपंच,निमसोड.
निमसोड येधील कुराण मळा , महादेव मळा, पोपळकरवाडी ,पश्रि्चम घाडगेमळा, कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला असून या भागामध्ये आरोग्य विभागाची चार स्वतंत्र पथके तयार करून या भागातील संपूर्ण घरांचा सर्वे व आरोग्य तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.-डॉ.प्रियांका पाटील, वैद्यकिय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र ,निमसोड