स्थैर्य, फलटण, दि. २ : घाटकोपर, मुंबई येथून बरड ता. फलटण येथे आलेल्या ५५ वर्षीय महिलेला लक्षणे असल्याने दि ३०/०५/२०२० रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल काल (दि. १ जून) रोजी पाॅसिटीव्ह आलेला आहे. तसेच विक्रोळी येथून वडले, फलटण येथे आलेल्या ३५ वर्षीय पुरुषाचा स्वॅब ही पाॅसिटीव्ह आला आहे. वडले येथील पाॅसिटीव्ह आलेल्या ३५ वर्षीय पुरुषाच्या वडिलांची करोना चाचणी यापूर्वीच पासिटीव्ह आलेली असून काल (दि. १ जून) अखेर करोना बाधित असलेले एकूण ९ रुग्ण फलटण तालुक्यात आहेत. त्या सोबत तालुक्यात ह्या पूर्वी एकूण ९ रुग्ण करोना पासून बरे झाले असून तालुक्यात ३ जणांचा करोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
काल (दि. १ जून) अखेर २९०० व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये असून ज्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील करोना केअर सेंटरच्या कन्फर्म वार्ड मध्ये एक रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये ६९ रुग्ण आहेत. करोनाच्या काल (दि. १ जून) घेतलेल्या एकूण ४ चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. अक्षतनगर, कोळकी येथील ४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना होम आयसोलेशनचे आदेश बजावण्यात आलेले आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.