स्थैर्य, सांगली, दि. 10 : रयत व महारयत अॅग्रो इंडिया प्रा.लि.कंपनीच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायातून शेतकऱ्यांची कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी सुधीर सुभाष कापरे (४३,धनकवडी, पुणे) व रोहित मोहन पुराणिक (४३रा.गोखलेनगर, पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी १५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे अमिष दाखवून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील सुमारे बाराशेहून अधिक लोकांची फसवणूक झाल्याने गतवर्षी खळबळ उडाली. या कंपनीचा संस्थापक सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष अरबुने हे दोघे एका बड्या नेत्याशी सलग्न असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनी केला. त्यामुळे या दोघासह गणेश शेवाळे (बहे), हणमंत जगदाळे (रा.अंबक, चिचणी) या चौघांना यापूर्वीच अटक केली आहे. तर मध्यंतरीच्या काळात हा तपास थंडावला होता. माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर कापरे व पुराणिक यांना अटक करण्यात आली. तर या गुन्हयातील विजय ज्ञानदेश शेंडे व मृगेश जयवंत कदम (दोघे रा.पुणे) हे अद्याप परागंदा आहेत.
या फंडयातून संशयीतांनी १२२० गुंतवणूकदारांची सुमारे साडे आठरा कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले. या प्रकरणी वाळवा तालुक्यातील पेठ येथील तानाजी निवृत्ती कदम यांनी दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी फिर्याद दिली. पोलीसांनी टप्याटप्याने आरोपी अटक करून सुमारे ३३ लाख रुपयांचा माल हस्तगत केला. यामध्ये चार चाकी, दुचाकी वाहने, यंत्र सामुग्री, संगणक व अन्य साहित्याचा समावेश आहे.