बाळुपाटलाच्या वाडी जवळ रेल्वेच्या धडकेत दोन वानरांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । लोणंद । लोणंद- निरा दरम्यान काल सायंकाळनंतर पुणे ते मिरज दरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या धडकेने लोणंद जवळील बाळू पाटलाची वाडी हद्दीत दोन वानरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक वानर गंभीररित्या जखमी झाले.

आज दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी बाळु पाटलाचीवाडी गावचे सरपंच नवनाथ धायगुडे अपघात झाल्याच्या ठिकाणाजवळून जात असताना त्यांना एक जखमी वानर रेल्वेमार्गाच्या लगत आढळून आल्यावर त्यांनी त्याला हाताने उचलून सुरक्षित ठिकाणी झाडाच्या सावलीत नेऊन ठेवले. तसेच गावातील तरूणांच्या मदतीने आजूबाजूस पाहणी केली असता अजून दोन मृत वानर रेल्वे मार्गालगत आढळून आले.

सरपंच नवनाथ धायगुडे यांनी करण धायगुडे, ऋषिकेश धायगुडे, मंगेश धायगुडे, राजेंद्र चोरमले, पप्पू सावंत, राजेंद्र धायगुडे यांना मदतीला घेत फलटणचे वनपाल राजेंद्र आवारे यांच्या सल्ल्याने लोणंद येथील पशुवैद्यकीय डाॅ. मुळे यांच्याशी संपर्क करून जखमी वानराला बुरूंगले यांच्यामार्फत प्रथमोपचार उपलब्ध करून देण्यात आले. दुपारी खंडाळा वनविभागाचे वनपाल राहूल जगताप आणि टिम घटनास्थळी पोहचल्यानंतर जखमी वानरास तातडीने शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना केले तर दोन मृत वानरांना पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले.

शिरवळ येथे जखमी वानरावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे वनपाल राहूल जगताप यांनी सांगितले असून त्यास पुढील उपचारासाठी रेस्क्यू टिमच्या मार्फत पुणे येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

बाळू पाटलाची वाडीचे युवा सरपंच नवनाथ धायगुडे आणि त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच जखमी वानरास मदत मिळाली . मुक्या प्राण्यांबद्दल दाखवलेली तळमळ आणि मदतीसाठी केलेले प्रयत्न याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!