दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
लोणंद शहरातील मार्केट यार्ड परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघाजणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख ६७ हजार १०० रूपये किमतीचा १४.६८४ किलो ग्रॅम गांजा व १४ लाखांची स्वीफ्ट व स्वीफ्ट डिझायर अशा कार जप्त केल्या आहेत.
याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणार्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते. दि. २६ ऑगस्ट रोजी पो.नि. अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी मंगलेश भोसले (रा. सोनगाव, ता. बारामती, जि. सोलापूर) हा कार (एमएच-११-बीएच-९०५५) मधून अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सपोनि रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकासह त्या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या पथकाने लोणंद शहरातील मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून मंगलेश भोसले व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून एकूण ३ लाख ६७ हजार १०० रूपये किमतीचा १४.६८४ किलो गांजा व दोन कार एकूण किंमत १४ लाख असा मिळून सुमारे साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वरील दोघाही आरोपींविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेला आरोपी मंगलेश भोसले याच्यावर सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.