स्थैर्य, मुंबई, दि. १६: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. क्राइम इनव्हेस्टिगेशन युनिट (CIU) चे माजी प्रमुख सचिन वाझे यांच्याच टीमने ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेजचा DVR अर्थात डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर नेला होता. त्यांना 25 फेब्रुवारी रोजी स्फोटक प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. याच दरम्यान, त्यांच्या (वाझे) टीमने हा डीव्हीआर नेला होता. आता NIA च्या टीमने तो परत मिळवला आहे.
आता सचिन वाझे यांच्या टीमने त्यांच्या कॉलनीतील डीव्हीआर का काढून घेतला होता असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान, आणखी एक माहिती समोर आली आहे, की स्फोटकांनी भरलेली ती स्कॉर्पिओ कार प्रत्यक्षात चोरीलाच गेली नव्हती असे NIA च्या निदर्शनास आले आहे.
सोसायटीने DVR देण्यापूर्वी लिखित पुरावा मागितला होता
सोसायटीत राहणाऱ्या एका माजी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की ‘CIU च्या पथकातील 4 जण 27 फेब्रुवारी रोजी सोसायटीच्या क्लब हाउसमध्ये आले होते. त्यांनी DVR जब्त केल्याचे म्हटले. त्यावर सोसायटीतील सदस्यांनी त्यांना लेखी स्वरुपात याचे कारण विचारले. लेखी दिल्याशिवाय DVR देऊ शकणार नाही असेही त्यांना म्हटले होते.
यानंतर पोलिसांपैकी एकाने त्यांना लेखी नोट दिली. ज्यावर असे लिहिले होते की, ‘कलम CRPC नुसार आम्ही साकेत सोसायटीला नोटीस देत आहोत की मुंबई गुन्हे शाखा, CIU, DCB, CID मुंबईला कलम 286, 465, 473, IPC 120 (B), इंडियन एक्सप्लोसिव्ह अॅक्टमध्ये दाखल FIR क्रमांक 40/21 च्या तपासासाठी साकेत सोसाइटीचे दोन्ही व्हिडिओ रेकॉर्डर हवे आहेत. नोटिशीत तपासाला सहयोग करण्याचा आदेशही देण्यात आला होता.’
रियाजुद्दीन काजी देखील संशयाच्या भोवऱ्यात
NIA ने वझेंच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या दोन अधिकारी CIU चे API रियाजुद्दीन काजी आणि एक PSI व्यतिरिक्त दोन ड्रायव्हरांची सोमवारी साडे 9 तास चौकशी केली आहे. ही चौकशी आजही सुरू राहणार आहे आणि या प्रकरणामध्ये NIA काही इतर लोकांनाही अटक करु शकते. CIU ची जी टीम वाझेंच्या सोसायटीमध्ये DVR घेण्यासाठी पोहोचली होती त्यामध्ये काजीही सहभागी होती.
स्कॉर्पियो चोरी न होण्याचे संकेत मिळाले
दरम्यान NIA सूत्रांच्या आधारावर एक मोठी माहिती समोर आली आहे. CCTV फुटेजच्या तपासात समोर आले आहे की, मनसुख यांची स्कॉर्पियो कधी चोरीच झाली नव्हती. तर ही स्कॉर्पियो 18 ते 24 फेब्रुवारीच्या काळात अनेक वेळा सचिन वाझेंच्या सोसायटीमध्ये दिसली होती. हिरेन यांनी आपल्या जबाबात सांगितले होते की, 17 फेब्रुवारीला मुलुंड-ऐरोली रोडवरुन त्यांची स्कॉर्पियो गायब झाली होती. फॉरेंसिक रिपोर्टवरुनही सिद्ध होते की, कारमध्ये कोणतीही फोर्स एंट्री झालेली नाही. गाडी चावीने उघडण्यात आलेली आहे.