मद्यपान करत बसलेल्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून दोन लाखाचा ऐवज लुटला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२२: शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहाजणांनी गळ्याला कोयता लावून 1 लाख 73 हजारांची रोकड, मोबाईल, किंमती घड्याळ असा एकूण दोन लाखाचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेल्याची खळबळजनक उघडकीस आली.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिवाजी निकम (वय 43, मूळ रा. तडवळे संमत कोरेगाव, सध्या रा. रामडोह आळी, वाई यांनी) तक्रार दिली आहे. दि. 18 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घडली असून तक्रारदार अजित निकम व त्यांचा मित्र अमित अशोक साबळे हे शिवथर गावच्या हद्दीतील धोम कालव्यानजिक रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसले होते.

त्यावेळी तिथे अचानकपणे दोन मोटारसायकलवरुन सहाजण 20 ते 25 वयोगटातील युवक तिथे आले. त्यांनी अजित निकम यांच्या डोक्यात कोयत्याची मूठ मारली तर अमित साबळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चोरट्यांनी अमित साबळे यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांना जिवे मारण्याचा धाक दाखवून निकम यांच्याकडे असलेली रोख रक्कम 1 लाख 73 हजार, दोन मोबाईल, घड्याळ असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला.

या घटनेमुळे निकम व साबळे भयभीत झाले. अजित निकम यांनी दि. 20 रोजी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात जावून अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून तपासाबाबत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. सहाजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी हे अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!