स्थैर्य, औंध, दि. ०८ : पुसेगाव येथून आले पीक काढणीसाठी औंधमार्गे हिंगणगावला निघालेला टेंम्पो औंध येथे आल्यानंतर चालकाला खबालवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या पुलाचा अंदाज न आल्याने टेम्पोवरील ताबा सुटला आणि पलटी झाला. यामध्ये टेम्पोतील दोनजण जागीच ठार तर बाराजण जखमी झाले. अपघातात ठार झालेले कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये २५ वर्षाचा युवक व १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी सकाळी झाला.मृतांमध्ये रामेश्वर चंपालाल चौहान वय २५ हल्ली रा.पुसेगाव मूळ गाव मध्यप्रदेश.मुन्नी प्रकाश पीपलोदाय वय १३ यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी दि. ७ रोजी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला एक टेंम्पो (एम एच ११ एजी ६०६२) सकाळी साडे सातच्या सुमारास औंधनजीकच्या खबालवाडी रस्त्याकडे जाणार्या पुलानजीकच्या वळणावर आला असता अचानक पलटी झाला. यात टेम्पोमधील दोन जण जागीच ठार झाले तर टेम्पोतील इतर बारा जखमी कामगारांवर औंध ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून साताऱ्याला हलविले.पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचा झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहेसहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, पोळ आदींनी अपघातस्थळी भेट दिली.सदर घटनेची औंध पोलीस ठाण्यात नोंद झाली असून टेम्पो चालक रामेश्वर धनजा पाचपुला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.