
दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । नागठाणे । ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गालगत थांबलेल्या मालवाहक टेंपोला भरधाव वेगाने आलेल्या वॅगन-आर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील वयोवृद्ध दांपत्य ठार झाले. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. धोंडिबा केशव साळुंखे (वय ६७) व त्यांच्या पत्नी लक्ष्मी धोंडिबा साळुंखे (वय.६१,दोघे रा.हल्ली घणसोली,नवी मुंबई,मूळ रा.ढेबेवाडी, ता.पाटण) अशी अपघातात मृत झालेल्या दांपत्याचे नाव आहे. तर माधुरी रमेश साळुंखे (वय २०, रा. हल्ली घणसोली, नवी मुंबई, मूळ रा. ढेबेवाडी, ता. पाटण), मच्छिंद्र किसन जाधव (वय ३४), पत्नी तनुजा मच्छिंद्र जाधव (वय.३२) व मुलगा तनुज मच्छिंद्र जाधव (वय.२.५ वर्ष,सर्व रा.हल्ली कोपरखैरणे, नवी मुंबई, मूळ रा.अंगुडेवाडी, पो.वेळे, ता.वाई,जि.सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. षष्ठीनिमित्त हे सर्वजण देवदर्शनासाठी जोतिबा (कोल्हापूर) येथे जाण्यासाठी नवी मुंबई येथून कारने निघाले होते.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ९ वाजता मुंबई येथून भंगार साहित्य घेऊन राजू लियाकत मुजावर (वय.४३,रा.शिराळा,डांगे चौक,ता.वाळवा,जि.सांगली) हे त्यांच्या मालकीचा अशोक लेलंड मालटेंपो घेऊन किर्लोस्करवाडी (सांगली) येथे निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा व क्लिनर होते. त्यांचा टेंपो बुधवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान महामार्गावरील नागठाणे गावच्या हद्दीत आला असता गाडीचा पुढील टायर पंक्चर झाला.त्यामुळे त्यांनी टेंपो महामार्गाच्या बाजूला लकी चिकन सेंटर समोर उभा केला.
सोबत असलेल्या मुलगा व क्लिनरला बरोबर घेऊन त्यांनी पंक्चर झालेले चाक बदलले आणि त्यानंतर शेजारी असलेल्या चहा टपरीवर ते चहा पीत असतानाच त्यांच्या टेंपोला।पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या व्हेगन आर कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील धोंडिबा केशव साळुंखे, लक्ष्मी धोंडिबा साळुंखे, माधुरी रमेश साळुंखे, मच्छिंद्र किसन जाधव, तनुजा मच्छिंद्र जाधव व तनुज मच्छिंद्र जाधव हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी व नागठाणे येथील जनता क्रेनचे सोहेल सुतार व अझीम सुतार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी सातारा येथे पाठविले. मात्र, उपचारापूर्वी धोंडिबा साळुंखे व लक्ष्मी साळुंखे यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर सध्या सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची फिर्याद माल टेंपोचालक राजू लियाकत मुजावर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार विजय देसाई व प्रकाश वाघ करत आहेत.