
दैनिक स्थैर्य । 16 मार्च 2025। कराड। पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ पुलाचे काम सुरू असताना सुमारे 32 टनाचा बीम कोसळल्यामुळे दोन जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना नऊच्या सुमारास संगम हॉटेल समोर घडली. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा भव्य पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. संगम हॉटेल समोर जिथे हा पूल खाली उतरणार आहे. तेथील काही अंशी काम बाकी आहे. याच परिसरात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोठ्ठा बीम उंच उचलून वरती ठेवण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी नट बोल्ट मधून क्रेनचा काही भाग निसटल्यामुळे बीम खाली कोसळला.
बीम कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. सुदैवाने या बीमच्या खाली कोणी नव्हते. मोठ्या आवाजानंतर पळापळी करताना डीपी जैन कंपनीचे दोन कामगार किरकोळ जखमी झाले.
या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड वाहतूक शालेय शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळावर जाऊन वाहतूक सुरळीत केली. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताशिलकर यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली.