वेश्या व्यवसायासाठी महिलांची वाहतूक करणाऱ्या फलटण तालुक्यातील दोघांना अटक; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

करंजेपूल येथे नाकाबंदीदरम्यान दोन महिलांची सुटका; मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता


स्थैर्य, वडगाव निंबाळकर, दि. १७ सप्टेंबर: वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी दोन महिलांना जबरदस्तीने गाडीतून नेत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोठी कारवाई करत या महिलांची सुटका केली आहे. करंजेपूल बस स्टॉप परिसरात १५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी फलटण तालुक्यातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना करंजेपूल परिसरात काळ्या काचा असलेली एक लाल रंगाची संशयित स्विफ्ट गाडी (क्र. एम एच ११ एमडी ८०५५) फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून गाडी थांबवली असता, त्यात दोन पुरुष आणि दोन महिला आढळून आले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली असता, पीडित महिलांनी सांगितले की, त्यांना पैशाचे आमिष दाखवून पुण्यातील हडपसर येथून लोणंद येथे आणले होते आणि आरोपी त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलत होते.

याप्रकरणी पोलिसांनी सुयोग हिंदुराव खताळ आणि प्रीतम आप्पासाहेब घुले (दोघेही रा. कापडगाव, ता. फलटण) यांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्यासह पोलीस पथकाने विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!