स्थैर्य, मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका असतानाच राजकीय वादळही पाहायला मिळाले. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला.
बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.
बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल डोंगरे हेसुद्धा कोणे एके काळी ईशान्य मुंबईत वंचितचे नेतृत्व करत होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी डोंगरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. आता वंचितचे आणखी दोन आमदार सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत.