दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२३ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) येथे किरकोळ कारणावरून दोन गटात लोखंडी गज, काठीने मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ९ जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पांडुरंग रघुनाथ पवार (रा. भवानीनगर, राजुरी) यांनी पोलिसात दिली आहे.
सागर शहाजी साळुंखे, संग्राम शहाजी साळुंखे, योगीराज चिमाजी साळुंखे, विजय पोपट साळुंखे, प्रतीक योगीराज साळुंखे, राजेश बबन पोळ (सर्व राहणार भवानीनगर, राजुरी, ता. फलटण, जिल्हा सातारा) यांच्यासह अनोळखी तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजुरी, ता. फलटण गावच्या हद्दीत आदिराज ढाब्याजवळ २० जून रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास सचिन शंकर पवार व विजय पोपट साळुंखे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. सदरचा वाद मिटवण्यासाठी पांडुरंग पवार व शिवाजी पवार असे दोघेजण विजय साळुंखे यांचे घरी जाऊन सदरचा वाद आपापसात मिटवला. त्यानंतर पांडुरंग पवार, सचिन पवार, सुरेश पवार, दौलत पवार, चेतन पवार हे सचिन पवार यांच्या अधिराज ढाब्याजवळ रात्री ११:३० वाजता आले. त्या ठिकाणी सागर शहाजी साळुंखे व संग्राम शहाजी साळुंखे हे योगीराज चिमाजी साळुंखे, विजय पोपट साळुंखे, प्रतीक साळुंखे, राजेश बबन पोळ व अनोळखी तीन इसमांसह त्या ठिकाणी आले व त्याच्यातील सागर साळुंखे व संग्राम साळुंखे यांनी ‘तुम्ही आमच्या घरी कशाला आला होता’, असे म्हणून सागर साळुंखे यांनी त्याच्या हातात असलेला लोखंडी गज हा दौलत पवार व पांडुरंग पवार यांच्या डोयात मारला व त्यांना जखमी केले. त्यांच्या पाठोपाठ आलेले योगीराज चिमाजी साळुंखे, विजय पोपट साळुंखे, संग्राम शहाजी साळुंखे, प्रतीक योगीराज साळुंखे, राजेश बबन पोळ व अनोळखी तीन इसम यांनी आम्हा सर्वांना हातातील लाठी-काठी व अनोळखी इसमांच्या हातात असलेल्या लोखंडी पाईपने आम्हाला मारहाण केली व आम्हाला शिवीगाळ दमदाटी केली आहे. या मारामारीत पांडुरंग पवार व सचिन शंकर पवार यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर निकोप हॉस्पिटल फलटण येथे उपचार सुरू आहेत, अशी तक्रार पांडुरंग पवार यांनी पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक अभंग करत आहेत.