स्थैर्य, पांचगणी, दि. 18 : एका वाहनातून कत्तलीसाठी आणलेल्या दोन गाईंना मंगळवारी सायंकाळी गोरक्षकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पोलिसांच्या मदतीने या गाईंची सुटका करण्यात आली.
या गाईंना वेळे येथील गोवंश करुणा मंदिर या गोशाळेमध्ये पाठविण्यात आले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी येथील न्यायालयामध्ये हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी सायंकाळी मेटगुताड गावानजीक छोटा हत्ती वाहनातून (एम. एच. 11 सीएच. 3352) दोन गाईंची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक व पोलिसांना मिळाली. यावेळी गोरक्षक ओंकार पवार, गौरव जाधव, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
या वाहनामध्ये मागील बाजूस दोन गाई बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनचालक हिरण्य गावडे याला या गाई कुठे घेऊन जात आहे याबाबत विचारणा केली असता या गायी राजाराम भिसे याच्या संगण्यावरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले तसेच वाहतूक परवानाबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगितले.
बुधवारी रात्री या प्रकरणी चालक हिरण्य प्रकाश गावडे, वय-25 आखेगणी (टोपणेवाडी), ता. जावली व राजाराम जगन्नाथ भिसे, रा. करहर, ता. जावली या दोन जणांविरुद्ध सरकारतर्फे विजय साहेबराव चव्हाण यांनी फिर्याद दाखलकेली आहे. बुधवारी न्यायालयामध्ये हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहन क्षीरसागर तपास करत आहेत.