स्थैर्य, पुणे, दि. 26 : सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले जात असले तरी काळजी करण्यासारखे खूप काही आहे. परिस्थिती भयावह आहे, असे सांगतानाच राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत. तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र चालवत आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक फक्त मातोश्रीत बसून असतात तर दुसरे राज्यभर फिरत आहेत. आता तुम्हीच ओळखा ते कोण आहेत, असे ते म्हणाले. कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जास्तीत जास्त काय करणार? विरोधी पक्षनेत्याच्या प्रवासावर तुम्ही मर्यादा आणू शकत नाही. त्यांच्या आढावा बैठकांवरच तुम्ही मर्यादा आणू शकता. पण राज्यभर दौरे करताना विरोधी पक्षनेते जे बोलायचे ते बोलणारच, असेही ते म्हणाले. ऑपरेशन लोटस नावाचा कोणताही विचार आमच्या डोक्यात नाही. उलट या तीन पक्षांचा त्यांच्यावरच विश्वास नाही. त्यामुळेच ते एकमेकांना विश्वास देत आहेत. सरकार जाणार नाही, असे ते स्वत:ला आणि कार्यकर्त्यांना सांगत आहेत. आम्हीही म्हणतो सरकार नाही पडणार. पण गर्जेल तो पडेल काय, असा सवालही त्यांनी केला.
अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न
पुण्यात गंभीर परिस्थिती आहे. चार महिन्यानंतर का होईना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली पाहिजे. ही बैठक घेताना कद्रूपणा करू नये. विरोधी आमदारांनाही बैठकीला बोलवावे, असे सांगतानाच पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्याचे भाकीत केले जात आहे. आपण सर्व मिळवून हे भाकीत खोटं ठरवू. त्यात सरकारची मोठी भूमिका राहील, असेही ते म्हणाले तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात यावे. मुंबईत जास्तकाळ थांबू नये. अजितदादा अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावाही त्यांनी केला.
मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग
पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरही टीका केली. ही मुलाखत म्हणजे निव्वळ मॅच फिक्सिंग आहे. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि त्याला मुख्यमंत्री उत्तरे देणार. तुमचे केस वाढले… असले प्रश्न विचारणार. राऊत हे स्तुतिपाठक आहेत. त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी इतरांनी घ्यायला हवी. चार महिन्यानंतर मुख्यमंत्री मीडियासमोर आले आणि तेही सामनासमोर आले, असा चिमटाही त्यांनी काढला. सध्या राज्यात तीन पक्षांचा शो सुरू आहे. उत्तम शो आहे. त्यांना हा शो करण्याचे स्वातंत्र्य आहे. अशोक चव्हाण यांनी आधी रागवायचे आणि माझे काही म्हणणेच नाही, असे दुसर्या दिवशी सांगायचे. ठीक आहे. तुमचे काही म्हणणे नाही, तर आमचेही काही म्हणणे नाही, असेही ते म्हणाले.