स्थैर्य, सातारा, दि. 01 : करोनाच्या संकटाने कित्येक शोकांतिका जन्माला घातल्या. एका क्षणात होत्याचे नव्हते केले. कित्येकांच्या वाटय़ाला शेकडो मैलांची पायपीट आली. मुकी जनावरेही या तडाख्यातून सुटली नाही. त्यातून महामार्गावरील भरतगाव (ता. सातारा) येथे रस्त्याकडेला सोडलेली अन् आईविना पोरके झालेली दोन वासरु सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
करोनाजन्य परिस्थितीमुळे समाजमनाला हादरा देणाया, हलवून सोडणाऱ्या कित्येक घटना रोज वृत्तपत्रांत वाचावयास मिळत आहेत. ’सोशल मीडिया’तून जनमाणसांपर्यंत पोचत आहेत. महामार्गावर लगतच्या गावांतील लोकांना तर त्याचा प्रत्यय पदोपदी येताना दिसतो. आजदेखील उन्हातान्हाची, अवकाळी पावसाची पर्वा करताना कित्येक कामगार आपापल्या गावाची वाट पायी तुडवत जाताना दिसत आहेत. त्यापलीकडे जात महामार्गावरील भरतगाव येथे आपल्या आईविना दिसणारी दोन वासरे एकाकी अवस्थेत आढळुन आली आहेत. गेले चार- पाच दिवसांपासून महामार्गाच्या सेवारस्त्यालगत ही वासरे दिसत आहे.आपल्यासोबत घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे एक ते दीड महिन्यांची ही दोन नवजात वासरे मध्येच वाटेत सोडून दिले असण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे. परिसरातील काही युवकांनी या वासरापुढे चारा आणून टाकलेला आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांतून पाण्याची सोय केली आहे. सकाळी, संध्याकाळी सेवारस्त्यावरून फिरायला जाणारे परिसरातील लोक या वासरांजवळ थांबतात. हंबरणारे वासरु पाहून हळहळ व्यक्त करतात.