दैनिक स्थैर्य | दि. २४ जुलै २०२३ | फलटण |
फलटण शहरात कामासाठी आलेले दोघेजण चायनीज मांजाने गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत एकाचा चेहरा तर दुसर्याच्या हाताची दोन बोटे कापली आहेत.
या घटनेची माहिती अशी, चौधरवाडी (ता. फलटण) येथील दोन तरुण आज कामासाठी फलटण येथे आले होते. काम झाल्यानंतर मोटारसायकलवरून ते घरी निघाले असताना रस्त्यात चायनीज मांजाने त्यांना कापले. या घटनेत मोटारसायकलस्वाराचा चेहर्यावर डोळ्याच्या वरती भुवयीला कापले असून पाठीमागे बसलेल्या मित्राने तो मांजा पकडला म्हणून डोळा वाचला; परंतु मांजा हाताने पकडल्याने पाठीमागे बसलेल्या मित्राची दोन बोटे कापली आहेत. या चायनीज मांजाला एवढी धार होती की, बोटे नखांसह कापली आहेत. घटनेनंतर हे दोघे तरुण प्राथमिक उपचार घेऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
दरम्यान, चायनीज मांजावर बंदी असताना फलटण शहरात हा मांजा विकला जात असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी चायनीज मांजा विकणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.