
स्थैर्य, सातारा, दि. 17 ऑगस्ट : फायनान्स कंपनीकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत, एका महिलेसह दोघांनी स्वातंत्र्यदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
यातील एका पीडित व्यक्तीने सांगितले की, एका फायनान्स कंपनीने त्यांची गाडी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन विकली. याबाबत पोलिसांकडे आणि न्यायालयात दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने, आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात चार मंत्री असूनही सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

