दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । पुसेगावनजिकच्या विसापूर येथे वृद्ध दाम्पत्याची निघुर्ंण हत्या झाली होती. या गुन्ह्याचा वीस दिवसानंतर एलसीबीने छडा लावला असून वृद्ध महिलेच्या मावस जावयानेच कर्जबाजारी झाल्याने त्यांचा काटा काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संशयित सतीश शेवाळे रा. शनिवार पेठ, सातारा याच्यासह त्याचा साथीदार सखाराम मदने रा. पार्ले (उत्तर पार्ले) या दोघांना अटक केले आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 8 जुलै रात्री 7 वाजल्यापासून ते दि 9 जुलै रोजी रात्री या दरम्यान पुसेगांव पोलीस ठाणे हद्दीतील विसापुर येथील हणमंत भाऊ निकम वय 68 व कमल हणमंत निकम वय 65 यांचा खून झाला होता. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दि. 10 रोजी दाखल करण्यात आला. गुन्हा अतिशय संवेदनशील असल्याने गुन्हयाचा समांतर तपास करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विसापुर पुसेगांव येथे तळ ठोकून होते. हे पथक तांत्रीक मुद्दयांचे विश्लेषण करीत होते. त्यामध्ये एका इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे पथकाने दि. 26 रोजी दुपारी या संशयीतास गौरीशंकर कॉलेज जवळून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता गुन्हा एका साथीदारासोबत केला असल्याचे सांगितले. त्यावरून कराड येथून एका इसमास ताब्यात घेवून त्याचीही चौकशी केली असता त्याने गुन्हयात सहभाग असल्याचे सांगीतले. या दोन्ही संशयित आरोपींकडे चौकशी करून त्यांना पुढील कार्यवाही करीता पुसेगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे यांचे सुचनेप्रमाणे किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पो.हवा. मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, संतोष सपकाळ, पो. ना. अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, गणेश कापरे, मुनिर मुल्ला, पो. को. मथुर देशमुख, मोहसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने, रोहित निकम, वैभव सावंत यांनी ही कारवाई केलेली आहे. याचसोबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. शेळके, पो. कॉ. यशवंत घाडगे, सुशांत कदम यांनी गुन्हयाच्या अनुषंगाने तांत्रीक माहिती वेळोवेळी तात्काळ पाठपुरवा करून तपास पथकास पुरविली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्हयाचा तपास करून जेष्ट नागरीकांच्या दुहेरी खुनाचा अतिसंवेदनशिल गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी सर्वांचे अभिनंदन केलेले आहे.
नातेवाईकानेच केला विश्वासघात
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार संशयित हा वृद्ध महिलेच्या बहिणीचा जावई होता. संबंधित वृद्ध महिलेला दागिन्यांची आवड होती. हे ठाऊक असलेल्या व कर्जबाजारी सतीश शेवाळे यांनी पैशाच्या हव्यासासाठी संबंधित दाम्पत्यास संपर्क साधून त्या रात्री साथीदारासह गेला. त्यांच्यासोबतच जेवण आटोपल्यानंतर दोघांनी प्रथम प्रतिकार होवू नये म्हणून वृद्ध हणमंत भाऊ निकम यांची हत्या केली. यानंतर वृद्ध महिलेचा खून केला. दोघांचेही खून झाल्यामुळे हल्लोखोर हे परिचयाचेच असून वाच्यता होवू नये म्हणूनच दोघांचा काटा काढला असल्याचा कयास पोलिसांनी बांधून तपास सुरू केला. तपासाअंती नातेवाईक असलेल्या सतीशनेच काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.