दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ चाकूचा धाक एकाला दाखवून लुटणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. संजय एकनाथ माने, चाँद फरिद शेख (दोघे रा. सदरबझार, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील ते सदर बझार रस्त्यारव असणाऱ्या समाजकल्याण कार्यालयाजवळ बुधवार, दि. २0 रोजी वनराज शिवाजी कुमकर (रा. शनिवार पेठ, सातारा) यांना चाकुचा धाक दाखवून लुटले होते. चोरट्यांनी कुमकर यांच्याकडील चार पेनड्राईव्ह, मोबाइल जबरदस्तीने चोरून नेला होता.
याबाबतची तक्ररा कुमकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देवून सातारा शहर पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ‘गुन्हे प्रकटीकरण पथक’ शोध घेत होते. दरम्यान, या प्रकरणातील एक संशयित संजय माने हा गुन्हा घडल्यापासून सदरबझार परिसरात संशयास्पद वावरत असल्याची माहिती ‘गुन्हे प्रकटीकरण’चे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संजय माने याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चाँद शेख आणि एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. त्याच्या आधारे पोलिसांनी माने व शेख यांना अटक करून चोरीच्या गुन्ह्यातील एक मोबाइल, तीन पेनड्राईव्ह असा ८ हजार ६00 रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे, ज्योतिराम पवार, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, सागर गायकवाड, विक्रम माने, अंबादास केकाटे आदी सहभागी झाले होते.