दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा जिल्ह्यातील वयस्कर महिलांना लक्ष्य करून चेन स्नॅचिग करणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील संशायिताकडून चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनोज जगदीश शिंदे, वय २५, राहणार शिवनगर, अमर लक्ष्मी, कोडोली, ता. सातारा आणि दिनेश भरत दिंडे, वय ३६, रा. गव्हाणवाडी, ता. पाटण अशी अटक केलेले इसमांची नावे आहेत.
अजय बंसल पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यातील निर्मनुष्य ठिकाणांवर लक्ष ठेवून वयस्कर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चेन स्नॅचिगचे झालेले गुन्हे उघडकीस करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी याबाबच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली पथक स्थापन केले होते.
चेन स्नॅचिग गुन्ह्यांची माहिती घेत असताना दोन संशयितांनी सातारा शहर हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी एका वयस्कर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने पडले असल्याची माहिती मिळाली. संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सातारा शहर, रहिमतपूर, कराड अशा वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खात्री केली असता त्यांनी जिल्ह्यांमध्ये चार गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहाय्यक पोलीस फौजदार तानाजी माने, पोलीस हवालदार संकपाळ, अतिश घाडगे, पोलीस नाईक साबीर मुल्ला, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, शिवाजी भिसे, अमोल माने, मंगेश महाडिक, मयुर देशमुख, वैभव सावंत, संतोष निकम, प्रवीण पवार, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला.