
फलटण एस.टी. स्टँड परिसरातील ‘पे अँड पार्क’मधून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या आरोपींकडून फलटण आणि अकलूज येथून चोरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 28 मार्च : फलटण बस स्थानक (S.T. Stand) परिसरातील ‘पे अँड पार्क’मधून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या फलटण शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींकडून फलटण येथील एक आणि अकलूज (ता. माळशिरस) येथून चोरलेली एक अशा एकूण दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११:०० ते २:०० वाजेच्या दरम्यान कृपाल श्रीपाल टाळकुटे (वय ३५ वर्षे, रा. रविवार पेठ, फलटण) यांनी त्यांची ६० हजार रुपये किमतीची ‘होंडा शाईन’ (MH 11 BT 9490) मोटारसायकल फलटण एस.टी. स्टँडच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये हँडल लॉक करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ती लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दि. २६ मार्च रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून बीएनएस (BNS) कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा तपास आणि कारवाई:
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी व वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत या चोरीबाबत पक्की माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे, मुकेश घोरपडे आणि अतुल बडे यांना आरोपींच्या शोधाबाबत सूचना दिल्या. या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १) निवृत्ती शिवाजी देशमुख (वय ३२ वर्षे) २) वसंत ऊर्फ पप्पु मारुती लष्कर (वय ३० वर्षे) (दोघेही रा. अलगुडेवाडी, ता. फलटण, जि. सातारा)
दोन दुचाकी हस्तगत:
अटक केल्यानंतर या दोन्ही आरोपींकडे सखोल आणि कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्यांनी फलटण एस.टी. स्टँड येथून होंडा शाईन मोटारसायकल आणि अकलूज (ता. माळशिरस) येथून एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून या दोन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासाकामी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष नाळे करत आहेत.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदरची धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल खांचे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. संतोष नाळे, मुकेश घोरपडे आणि अतुल बडे यांनी पूर्ण केली आहे.
