
दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । खटाव । खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील सत्तावीस वर्षीय युवक सुरज भगवान पवार याचा गांजा पिल्याने मृत्यू झाला. याची नोंद सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात झाली आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सुरज हा शनिवारी रात्री जेवण न करता फक्त गांजा पिवूनच झोपला होता. रविवारी सकाळी तो उठत नसल्यामुळे त्याला नातेवाईकांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती येथून देण्यात आली. याबाबतची खबर वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.