स्थैर्य, मुंबई, दि.१०: टीआरपी
घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आल्यानंतर या संदर्भात
मुंबई पोलिसांचे विशेष पथक तपास करत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत ११
आरोपींना अटक केली होती. आता मुंबई पोलिसांनी यातील बाराव्या आरोपीला अटक
केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव घनश्याम दिलीप कुमार सिंग असून
त्याला ठाणे घोडबंदर रोड येथील ग्रीन एकर्स परिसरातून अटक करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा
आरोपी रिपब्लिक वृत्तवाहिनीचा डिस्ट्रीब्यूटर हेड आहे. रिपब्लिक
वृत्तवाहिनी लोकांनी जास्त पाहावी यासाठी हंसा रिसर्च ग्रुपच्या काही
कर्मचा-यांसोबत मिळून त्याने पैसे देऊन वाहिनीचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न
केला. पोलिसांनी यासंदर्भात हा दावा केला आहे. या अगोदर घनश्याम सिंग याची
मुंबई पोलिसांनी वारंवार चौकशी केली होती. रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या
डिस्ट्रीब्यूशन संदर्भातील काही कागदपत्रांची मागणी करून ती तपासलीसुद्धा
होती. यानंतरच्या तपासातील व इतर आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून घनश्याम
सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. घनश्याम सिंह याला न्यायालयात मंगळवारी
हजर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून त्याच्या पोलीस कस्टडीची मागणी
करण्यात येणार आहे.