स्थैर्य, मुंबई, दि.२: वेळेत कार्डियक अँम्ब्युलन्स न मिळाल्या मूळे एका कोरोनाग्रस्त तरुण पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू हा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अतिशय वेदना देणाऱ्या असून, हा मृत्यू ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच झाला आहे त्यामुळे ठाकरे सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा जास्त झाली आहे, परंतु पैसे असून सुद्धा सरकार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील केवळ 25% रक्कमच खर्च करण्यात आली. हे केवळ संतापजनक नसून सरकारने केलेले दुष्कृत्य आहे, त्यामुळे सरकार विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे.
तसेच, पत्रकारांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य मंत्र्यानी 3 जून रोजी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दिले होते. परंतु आज 3 महिने उलटून गेल्यानंतरही सरकार कडून या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी सुद्धा आ. भातखळकर यांनी केली.
एकीकडे या ठाकरे सरकार मधील दोन दोन मंत्री स्वतः च्या वापरासाठी शासकीय पैशांमधून 25 लाखांच्या गाड्या घेतात पण दुसरीकडे साधी ऍम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे एका पत्रकाराचा मृत्यू होतो ही बाब अतिशय निंदनीय आहे.