
स्थैर्य, 23 फेब्रुवारी, सातारा : नागरिकांनी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा, आरोग्यदायी कृषी उत्पादने थेट शेतक-याकडून ग्राहकांना खरेदी करता यावी व ताजे व स्वच्छ अन्नधान्य, व दर्जेदार फळाच्या खरेदीचा लाभ घेता यावा यासाठी कृषी विभागाच्या अधीक्षक कृषि कार्यालयामार्फत सातारा येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात दि 20 व 21 फेब्रुवारी कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून 25 लाखांची उलाढाल झाली .
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवरांनी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी गटांच्या विविध उत्पादनांच्या स्टॉलना भेट दिली व विविध वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
पौष्टिक तृणधान्ये व त्यांचे आहारातील महत्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांनी या महोत्सवात आरोग्यदायी कृषी माल खरेदी केला. महोत्सवामध्ये ज्वारी च्या विविध वाणाचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी बोन्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, माण व खटावची बाजरी, ज्वारी विक्रीसाठी उपलब्ध होते. कडधान्यामध्ये जात्यावर दळलेली मूग, उडीद, काळ्या घेवाड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे त्याचबरोबर महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यात उत्पादित झालेली व उच्च करकुमिन असलेली वाईची सेंद्रिय हळद, साकडी पाण्यावरील तेल, तसंच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल, पापड, नाचणी सत्व, नाचणी रवा तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रमी विक्री झाली. या महोत्सवामध्ये कृषी माल व पौष्टिक तृणधान्य प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी 55 स्टॉल्स उभारण्यात आलेले होते.
कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाप्या घेवडा, खंडाळा येथील देशी बाजरी, कन्हाडची नाचणी, जावळी, पाटणचा देशी इंद्रायणी तांदूळ, फळांचे गाव धुमाळवाडी येथील डाळिंब, पेरू, चिक्कू, अंजीर, द्राक्षे, रामफळ, बोर, चिंच, पपई व महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी अशा दर्जेदार फळांची सातारा शहरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. महोत्सवाच्या माध्यमातून कृषिमाल खरेदी व विक्री साठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे कृषी माल विक्री महोत्सव प्रत्येक महिन्यात घ्यावा अशी मागणीही शेतकरी गटांनी केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे

