दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी सातारा शहर आणि सातारा तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे . हे निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना रवाना करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे, नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.
१९९३ च्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि राष्ट्रावर पुन्हा संकट येऊ नये या साठी, आतंकवादी विचारसरणीला पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात आणि राज्यभर आंदोलने करणार आहोत अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अन्यथा जनसामान्यांच्या होणाऱ्या उद्रेकास राज्यशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.
यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, तालूका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, महिला मोर्च्या शहर अध्यक्ष सौ रीना भणगे, इ कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.