दैनिक स्थैर्य । दि. 19 ऑक्टोंबर 2022 । फलटण । मध्य रेल्वेच्या सोलापूर उपविभागामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या सोलापूर उपविभागाचे अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात आली होती. परंतु रेल्वे अधिकार्यांवर ब्रिटीश अधिकार्यांसारखा पगडा असून खासदारांनी सुचवलेली कामेसुद्धा मार्गी लागत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर उपविभाग अध्यक्षपदाचा राजीनामा आपण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. असे म्हणत रेल्वे मंत्रालयाला भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घरचा आहेर दिला.
फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह बोलत होते.
खासदार रणजितसिंह म्हणाले, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कामकाज हे अतिशय उत्कृष्ठ असून त्यांच्याबद्दल खासदारांची नाराजी नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागतात. परंतु रेल्वे अधिकारी ही कामे मार्गी लावत नाहीत. त्यामुळे आगामी काळापासून आपण थेट रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातूनच प्रलंबित कामे मार्गी लावणार आहोत, असे म्हणत नुकत्याच झालेल्या मध्य रेल्वेच्या सोलापूर उपविभागीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला आहे. आपल्यासोबत मंडळातील खासदारांनी राजीनामा दिला आहे.
रेल्वेच्या बाबतीत कोरोनापुर्वी असणार्या सर्व थांब्यांवर सर्व रेल्वेगाड्या पुन्हा पुर्ववत सुरु झाल्या नाहीत. तरी त्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी सर्व खासदारांची आहे. यासोबतच रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून जी विकासकामे होतात ती अत्यंत निकृष्ठ दर्जाची होत आहेत. काही रेल्वे स्थानकांमध्ये उदा. फलटण तालुक्यातील आदर्की येथे असलेल्या रेल्वेस्थानकाचा फायदा येथील ग्रामस्थांनासुद्धा होत नाही अशा रेल्वे स्थानकांमध्ये बदल करुन ती संबंधित गावातून जाणे गरजेचे आहे. यामध्ये अधिकारी हे काहीही सहकार्य करताना आढळत नाहीत, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.