स्थैर्य, मुंबई, दि. 26 : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी बी. राधकृष्णन यांची नागपूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच आबासाहेब मिसाळ यांची कोकण विभागीय आयुक्त, तर शेखर चन्ने यांची एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज 16 वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये बहुचर्चित अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. नाशिक व नवी मुंबईप्रमाणे नागपूरमध्येही तुकाराम मुंढे यांची कारकीर्द गाजली. मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मुंढे विरुद्ध भाजप असा संघर्ष सतत सुरू होता. कोरोना परिस्थिती हाताळण्यावरूनही लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त असा वाद सुरू होता. अखेर त्यांची तेथून बदली करून मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे याना कोरोनाची लागण झाल्याने दोन दिवसांपासून ते होमक्वारन्टाईनमध्ये आहेत. त्यातच त्यांच्या बदलीचा आदेश आला आहे.
मिसाळ कोकण आयुक्त !
अन्य बदल्यांमध्ये नवी मुंबई मनपा आयुक्त आबासाहेब मिसाळ यांची कोकण विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. युनोतील प्रतिनियुक्तीवरून परतलेले श्रीकांत देशपांडे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी (प्रशासकीय सुधारणा) नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक महापालिका आयुक्तपदी कैलाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकेश चंद्रा यांना जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.अंशू सिन्हा यांना कौशल्य विकास विभागाच्या सचिवपदी तर परिवहन आयुक्त एस.एम.चन्ने यांना एस.टी. महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. एन.रामास्वामी यांना राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.
आर.विमला यांची जलजीवन मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉ.एन.बी.गिते यांना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.अविनाश ढाकणे हे नवे परिवहन आयुक्त असतील. सी.के.डांगे यांना भूजल सर्वेक्षण पुणेच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. दीपा मुधोळ मुंडे यांची जलस्वराज प्रकल्प, नवी मुंबईच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. एस.एस. पाटील यांची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून तर रोहन घुगे यांची चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.