दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । ऐतिहासिक मंगळवार तळे स्वच्छता मोहिमेला सोमवार पासून प्रारंभ झाला. तळ्यातील शेवाळेलेले पाणी मोटारीद्वारे उपसून लगतच्या ओढ्यात सोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नगरसेवक वसंत लेवे मित्र समूहाच्या वतीने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली .
वसंत लेवे यांनी सातारा पालिकेची अग्निशमनं यंत्रणेची गाडी मागविली. आणि सुरवातीला ऑक्सीजन निर्माण होण्यासाठी स्वच्छ पाणी तळ्यातील पाण्यात अभिसरणासाठी मिसळण्यात आले . काही खाजगी कर्मचारी व यंत्रणा मागवून तळ्याच्या एका टोकाला जाळीदार गाळणी लावून टप्याटप्याने शेवाळाचा थर खेचून घेण्यात आला. पाण्याला त्यावेळी प्रचंड दुर्गंधी येत होती. हेच पाणी समर्सिबल पंपाद्वारे खेचून लगतच्या ओढ्यामध्ये सोडण्यात आले. पालिकेचे दहा कर्मचारी व एक टीपर या मोहिमेत सामील करण्यात आला होता. तळ्याच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षवेलींची सुद्धा यावेळी छाटणी करण्यात आली. पुन्हा वेली पाण्यात उतरणार नाहीत याची प्रत्यक्ष काळजी घेतली जात आहे. तळ्याच्या तिन्ही बाजूंच्या पायरी मार्गाची सुद्धा स्वच्छता केली जात असून आतील मार्गिका सुद्धा स्वच्छ पाण्याने धुण्यात आल्या.
या कामाची स्वतः नगरसेवक वसंत लेवे, सुरेश काकडे, संतोष गायकवाड, सतीश लेवे, सचिन दीक्षित यांनी पाहणी केली. या उपक्रमाविषयी बोलताना वसंत लेवे म्हणाले, ऐतिहासिक मंगळवार तळे हे शहराच्या पश्चिम भागाचे वैभव आहे. या तळ्याची स्वच्छता राखली गेल्यास व अनुकुल सुविधा दिल्यास ही वास्तू सुद्धा पर्यटन दृष्ट्या समृद्ध होणार आहे. पाण्यात ऑक्सीजन तयार व्हावा, याकरिता काय काय उपाययोजना करतील याचे मार्गदर्शन खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून घेऊनच पुढील कार्यवाही करणार असल्याचे लेवे यांनी सांगितले.