
दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदाननिश्चिती नंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी शोध मोहिम जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे, ही मोहिम संबंधित विभागांनी समन्वयातून यशस्वी राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. जयवंशी बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे डॉ. राजेश गायकवाड, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम 2022-23 राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केले.
या मोहिमेमध्ये सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकूण 27 लाख 23 हजार 192 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 768 पथके तयार करण्यात आलेली आहेत. कुष्ठरोग व क्षयरोग आजाराच्या निदानाची सोय सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यांमध्ये मोफत केलेली आहे. निदान निश्चित झाल्यावर त्यावरील औषधोपचार देखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे श्री. गौडा यांनी बैठकीत सांगितले.
क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध मोहिमेची माहिती डॉ. गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे दिली.