दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । मुंबई । मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला होता. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृत मजारवर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली होती.
सदर मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास आले आहे. संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे.
माहिममधील अनधिकृत मजार प्रकरणावर आता एमआयमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतली जी मजार हटवण्यात आली ती मजार जर अनधिकृत असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे मी त्या कारवाईचं स्वागत करतो, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की माहीमसारख्या ठिकाणी एक मजार, दर्गा उभा राहतो आणि राज ठाकरे त्याचे व्हिडीओ दाखवतात आणि १२ तासांच्या आत कारवाई होते. मला असे वाटतेय की, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.
भाजपा, शिंदे गट आणि मनसेचा उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याचा प्लॅन आहे. माहिममधील मजारबाबत पोलीस कुठे झोपले होते?, प्रशासन कुठे झोपले होते?, असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी हेही सांगितलं की, एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मात्र नाही मिळणार साहेब…महाराष्ट्राची एक परंपरा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा महाराष्ट्रात जन्म झाला आहे. या महापुरुषांनी कधीही हिंदू-मुस्लिम केलं नाही, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
ते बांधकाम काही नवीन नव्हतं- उद्धव ठाकरे
सदर प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवनात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत आणि माहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्या विभागाचे दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्यांच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं. मात्र जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल..नाहीतर येवढे वर्ष कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होते. अशा राज्यात अनेक गोष्टी असतील, तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल, असा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.