दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महात्मा फुले यांच्या विचारांचे खरे वारसदार प्रा. हरी नरके होते. त्यांनी आपल्या साहित्यातून आणि आपल्या जगभर दिलेल्या भाषणातून महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार रूजवले आणि मांडले. महात्मा फुले यांचे ‘समग्र वाड्मय’ महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात प्रा. नरके यांचा मोलाचा वाटा आहे. सत्यशोधकी विचार मांडताना ते निर्भीडपणे आपले विचार मांडत. ते शरीराने आपल्यातून गेले असले तरी विचारांनी ते चिरंतन राहतील, असे मत ज्येष्ठ विचारवंत, फलटण साहित्य परिषदेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी महात्मा फुले चौक, फलटण येथे महात्मा फुले जयंती उत्सव समिती आयोजित प्रा. हरी नरके यांच्या श्रद्धांजली शोक सभेत व्यक्त केले.
प्रा. नरके यांनी खर्या अर्थाने सत्यशोधक विचार रुजवले. महात्मा फुले यांच्या साहित्यावर सखोल संशोधन करून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ती सत्य सांगणारी आहेत, ती आपण जरूर वाचावीत, असे मत सचिन मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड, फलटण तालुका आध्यात्मिक आघाडीच्या वतीने हभप केशवराव जाधव, आमिरभाई शेख, गोविंद भुजबळ, अमोल रासकर, विकास नाळे, फलटण तालुका कलाकार मंडळ यांच्या वतीने लक्ष्मण निकाळजे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस प्रा. रमेश आढाव, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, समीर तांबोळी, हरिष काकडे, बापूराव शिंदे, विजय शिंदे, रणजित भुजबळ, विकास शिंदे, प्रा. विशाल शिंदे, बाळासाहेब अडसूळ, दत्ता नाळे, विकास नाळे, वैभव नाळे, सुभाष अभंग, दीपक शिंदे, प्रमोद नाळे, अमोल शिंदे, संकेत शेवते, संदीप नेवसे, बंडू शिंदे, रोहन शिंदे, प्रा. अमोल आढाव, प्रविण फरांदे, स्वप्नील शिंदे, कुलदीप घनवट, किरण राऊत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. सतिश जंगम यांनी केले.