दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । मुंबई । राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.
इंडियन ऑईलच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे १०० ट्रूनॅट मशिन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होईल. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेसाठी या मशिनमुळे मोठे बळ मिळाल्याचे सांगत राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पालघर, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या मशिनच्या माध्यमातून क्षयरोग निदानासाठी वापर करण्यात येणार आहे. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अर्निबन घोष, महाव्यवस्थापक गौतम दत्ता आदी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.