स्थैर्य, दि.५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही ते या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. उपचार सुरू असतानाही ते रुग्णालयाबाहेर आपल्या कारमध्ये दिसून आले आहेत. एवढेच नव्हे, तर काळ्या रंगाच्या आपल्या कारमधून त्यांनी बाहेर थांबलेल्या आपल्या सर्थकांना हाथ दाखवून अभिवादन केले. हा संपूर्ण गोंधळ अवघ्या एका मिनिटात झाला. परंतु, असे करण्यापूर्वी त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मास्क न घातल्यामुळेच त्यांना कोरोना झाला अशी चर्चा सुरू आहे. त्यातच आणखी एक निष्काळजीपणा करून त्यांनी टीकाकारांचे लक्ष वेधले आहे.
कारमध्ये बसलेल्या इतर सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन
वॉल्टर हीड रुग्णालयातील डॉ. जेम्स फिलिप्स यांनी ट्विट करून सांगितले की गाडीमध्ये बसलेल्या सर्वांनाच आता 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागेल. ते कोरोनामुळे आजारी पडू शकतात किंवा त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. राजकीय नौटंकीसाठी ट्रम्प यांनी आपल्यासोबत इतरांचे जीव धोक्यात टाकले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कार केवळ बुलेटप्रफू नाही तर रासायनिक हल्ल्यांपासूनही सुरक्षित आहे. अशात त्यांच्यासोबत कारमध्ये बसलेल्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे.
कारमध्ये होते सीक्रेट सर्व्हिस एजंट
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारमध्ये नेहमीच सीक्रेट सर्व्हिस एजंट्स असतात. ट्रम्प रुग्णालयातून बाहेर पडले तेव्हा देखील त्यांच्यासोबत एजंट्स होते. ट्रम्प यांनी केवळ नियमांचे उल्लंघनच केले नाही तर आपल्या सिक्युरिटी स्टाफचे जीव धोक्यात टाकले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. अशात केवळ प्रसिद्धी आणि फोटो सेशनसाठी ट्रम्प यांनी ही स्टंटबाजी केली असा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनी आपले सर्वच दौरे रद्द केले. इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयाचे स्पष्टीकरण
ट्रम्प यांनी बाहेर पडण्यापूर्वीच त्याची माहिती ट्विट केली होती. त्यावर त्यांचे पर्सनल फिजिशियन म्हणाले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकदम ठीक आहेत. कोरोनावर होणाऱ्या उपचाराचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यातून आमची टीम समाधानी आहे. येत्या 24 तासांत त्यांची ताप उतरेल आणि ब्लड प्रेशरसह हार्ट रेट सुद्धा सामान्य होईल. तरीही इतक्या वाइट परिस्थितीत त्यांना रुग्णालयाबाहेर पडण्याची गरज का वाटली? त्यावर डॉक्टरांनी म्हटले की ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.