स्थैर्य,दि ५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आल्यानंतर अमेरिकी शेअर्सचा वायदा व्यवहार आणि आशियाई बाजारांत घसरण आली. एसअँडपी ५०० आणि डाऊ इंडस्ट्रियलचा वायदा करार दोन्ही काही वेळापर्यंत दोन टक्क्यांपेक्षा खाली आले. यानंतर १.४ टक्के नुकसानीत व्यवसाय करत होते. याशिवाय कच्च्या तेलाच्या भावात तीन टक्क्यांहून जास्त घसरण झाली.
चलन बाजारात ब्रिटिश पाउंड, ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड डॉलरच्या तुलनेत अमेरिकी डॉलरमध्ये तेजी पाहायला मिळाली. डॉलर निर्देशांक ०.३% वधारला. आशियाई बाजारांत चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हेंगसेंग शुक्रवारी बंद होते. चीनमध्ये १-८ ऑक्टोबरदरम्यान गोल्डन हॉलिडे आहे. या संपूर्ण आठवड्यात तिथे शेअर, रोखे, फॉरेक्स आणि कमॉडिटी वायदे बाजार बंद राहतील.
जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सुरुवातीची वाढ गमावत ०.७ टक्के नुकसानीसह २३,०२९.९० अंकावर आला. ऑस्ट्रेलियाचा बेंचमार्क एसअँडपी/ एएसएक्स २०० १.४ टक्के पडला. सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियाच्या बाजारात घसरण राहिली. युरोपीय बाजारात एफटीएसई फ्यूचरमध्ये १.०२% ची वाढ राहिली होती.
युरो स्टॉक्स ५० फ्यूचर्स आणि जर्मन डॅक्स फ्यूचर्स अनुक्रमे ०.०६% आणि ०.०३%ची वाढ होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या नोव्हेंबर वायद्याची किंमत ४.६४% घसरून ३९.०४ डॉलर होता. दुसरीकडे, अमेरिकी डब्ल्यूटीआय क्रूडच्या ऑक्टोबर वायद्याची किंमत ४.७८ घटून ३६.८७ डॉलर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याच्या किमतीने ०.३८% वाढीसह १,९१३.९० डॉलर प्रतिऔंसचा स्तर स्पर्श केला.
व्यवसाय जगताच्या दृष्टीने ट्रम्प चांगले
संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात अस्थिरता दिसू शकते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी अशा प्रकारचे वातावरण राहते. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन दोन्ही आपापले विचार देशातील नागरिकांसमोर ठेवत आहेत. उद्योग/व्यवसाय जगताबाबत बाेलायचे झाल्यास दाेन्ही उमेदवारांमध्ये डाेनाल्ड ट्रम्प जास्त चांगले राहतील. – देवेन आर. चौकसे, एमडी, के.आर. चोकसे सिक्युरिटीज
देशातील बाजारावर परिणाम दिसू शकतो
ट्रम्प यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर जगातील बाजारांतील धारणांवर परिणाम झाला. युरोपीय संघटना आणि ब्रिटनचे संबंध आतापर्यंत सर्वांत वाईट टप्प्यात पोहोचले आहेत. ब्रिटनने ब्रेक्झिट करारातून एकतर्फी माघार घेतल्यानंतर नाराज युरोपीय संघटनेने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे धारणा नकारात्मक झाल्या आहेत. याचा परिणाम सोमवारी देशातील बाजारावर दिसू शकतो. – अनुज गुप्ता, डीव्हीपी रिसर्च, एंजेल ब्रोकिंग