रणसिंगवाडीच्या त्रिशा फडतरेचे बुद्धिबळ स्पर्धेत यश; जिल्हास्तरावर निवड

वडूज येथील तालुकास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात पटकावला प्रथम क्रमांक


स्थैर्य, वडूज, दि. ३० ऑगस्ट : वडूज येथे आज संपन्न झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रणसिंगवाडी येथील श्री भैरवनाथ हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी त्रिशा समाधान फडतरे हिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे. या विजयामुळे तिची निवड आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

त्रिशा फडतरे हिने आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत हा विजय मिळवला. तिच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील, क्रीडा शिक्षक श्री. गिरी गोसावी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!