श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज (थोरले) यांना पुण्यतिथीनिमित्त सातार्‍यात अभिवादन


स्थैर्य, सातारा, दि. 15 डिसेंबर : हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक, स्वराज्यविस्तारक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या 276 व्या पुण्यातिथीनिमित्त संगममाहुली येथील समाधीस्थळी मावळा फौंडेशनच्या पुढाकाराने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शाहूमहाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायत संगम माहुली, जनता सहकारी बँक, दि गुजराथी अर्बन को-ऑप सोसायटी आणि सातारकर सहभागी झाले होते. यावेळी पुण्यतिथीबरोबर श्री.छ. शाहू महाराजांचा जयंती सोहळा ही दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय मावळा फौंडेशनच्यावतीने घेण्यात आला.

संगममाहुली येथील समाधीस्थळी झालेल्या अभिवादनास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जनता बँकेचे संचालक माधव सारडा, ड. चंद्रकांत बेबले, वजीर नदाफ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्यावतीने श्री.छ. शाहूमहाराज (थोरले) यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी फाउंडेशनच्या आणि श्री.छ. शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेत सातारा नगरीचे नाव शाहूनगरी असे करावे अशी मागणी केली. सातारा नगरपालिकेचे जे नवीन कार्यालय होत आहे, त्याच्या प्रवेशव्दाराजवळ शाहू महाराजांचा पुतळा बसवावा अशी आग्रही मागणी गेल्यावर्षी केली होती. त्याची दखल घेत पालिकेच्या नवीन कार्यालयात छ. शाहू महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे ही समस्त सातारकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असून येत्या रविवारी मतमोजणी आहे. यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी विजयी झाल्यास सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक व्हावे आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारावा असे आवाहन विनोद कुलकर्णी यांनी केले. भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योध्दा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर छत्रपती शाहू यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला.

 

शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. अत्यंत दूरदृष्टीने गड किल्ल्यावरील राजधानी नगरात वसाविण्याचा महत्वाचा निर्णय छत्रपती शाहूंनी सर्वप्रथम घेतला. यावेळी बोलताना अमोल मोहिते यांनी विनोद कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी नगराध्यक्षपदी संधी दिल्यास सर्वप्रथम छत्रपती शाहूंच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन त्यानंतरच नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. तसेच मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून संगम माहुली घाट परिसराचे सुशोभिकरण कामाचा प्रारंभ लवकरच होणार आहे. यामध्ये श्री.छ. शाहूमहाराज समाधी परिसराचेही सुशोभिकरण होणार असल्याचे अमोल मोहिते यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा शेवट प्रेरणा मंत्राने झाला. सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव नंदकुमार सावंत तर अ‍ॅड.चंद्रकांत बेबले यांनी आभार मांडले. याप्रसंगी राजेश जोशी, अमर बेंद्रे, गुजराथी अर्बनचे व्यवस्थापक सतीश घोरपडे, निलेश कुमठेकर, मंगेश गोगावले, तुषार महामूलकर, सचिन सावंत, संगम माहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे, संगम माहुलीचे सर्व ग्रामस्थ, जनता बँक, गुजराथी अर्बनचे सर्व संचालक, कर्मचारी, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि सातारकर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!