दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । मुंबई । माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील एक बहुआयामी नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत विधानसभेचे तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांना शोक भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
विधानसभेचे तालिका अध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे सहकारातील योगदान मोठे आहे. १९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या. शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा वेळा कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे. येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्त्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. कोपरगाव आणि शंकरराव कोल्हे या दोन्ही नावांचा एकमेकांशी अतूट असा बंध निर्माण झाला आहे. व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांची सामाजिक, राजकीय कारकीर्द भारदस्त अशीच होती. त्यांची उणीव निश्चितपणे जाणवत राहील. ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना सभागृहात सर्व सदस्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.