दुधेबावी येथे हुतात्मा वीरांगनांना वृक्षारोपणातून आदरांजली; टेकडीला दिले ‘ऑपरेशन सिंदुर टेकडी’ नाव

'माझी वसुंधरा अभियान' व 'द ब्रिलियंट हेल्थ अँण्ड अॅग्री' संस्थेचा संयुक्त उपक्रम; भाविक महिलांच्या श्रमदानाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश


स्थैर्य, दुधेबावी, दि. २० ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या २८ भारतीय वीरांगनांना आदरांजली वाहण्यासाठी दुधेबावी (ता. फलटण) येथील भवानीमाता मंदिराशेजारील टेकडीवर भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या हरित उपक्रमातून टेकडीला ‘ऑपरेशन सिंदुर टेकडी’ असे नाव देऊन हुतात्मा वीरांगनांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले.

‘माझी वसुंधरा अभियान’ आणि द ब्रिलियंट हेल्थ अँण्ड अॅग्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांनी झाडांची रोपे उपलब्ध करून दिली. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रोपे टेकडीवर नेऊन श्रमदान केले आणि पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा संदेश दिला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे, दुधेबावीच्या सरपंच भावना सोनवलकर, सुशांत निंबाळकर यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संस्थेच्या प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गाचा हरित, प्रदूषणमुक्त आणि समृद्ध वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!