
फलटण येथील महात्मा फुले चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने ‘महात्मा ज्योतिबा फुले’ हे पुस्तक देऊन उभारलेला अनोखा ‘फोटो पॉईंट’ लक्षवेधी ठरला.
स्थैर्य, फलटण, दि. 11 एप्रिल : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील महात्मा फुले चौकात आज त्यांना भावपूर्ण व विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्यासह शहरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या महान सामाजिक कार्याचे स्मरण केले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी आमदार सचिन पाटील यांच्यासोबत फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते रणजितसिंह भोसले, नगरसेवक रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, सौ. रुपाली सस्ते, राहुल निंबाळकर, किरण राऊत, पंचायत समिती सदस्य विकास नाळे, कोळकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप नेवसे, तरकारी व्यापारी बाळासाहेब ननावरे, ॲड. अभंग आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सर्वांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समतेच्या व सत्यशोधक विचारांना उजाळा दिला.
विचारांचा जागर करणारा अनोखा ‘फोटो पॉईंट’:
यंदाच्या या जयंती उत्सवाचे एक विशेष आकर्षण म्हणजे ‘महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती’च्या वतीने राबवण्यात आलेला एक स्तुत्य उपक्रम. केवळ प्रतिमा पूजन न करता विचारांचाही जागर व्हावा, या हेतूने समितीच्या वतीने चौकात एक खास ‘फोटो पॉईंट’ तयार करण्यात आला होता.
या ठिकाणी उपस्थितांना ‘महात्मा ज्योतिबा फुले’ या पुस्तकाची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी या पुस्तकासोबत आणि फोटो पॉईंटवर उभे राहून आवर्जून छायाचित्रे (फोटो) काढली. पुस्तकरूपी विचारांची भेट देणारा हा उपक्रम शहरवासीयांच्या विशेष पसंतीस उतरला असून, या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

