स्थैर्य, पुणे, दि.०३: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे करोनाने आज पहाटे निधन झाले. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनीही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन सरग यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु दुर्दैवाने शासन-प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर करोनाने बळी घेतला.
कार्यतत्पर, मनमिळावू, शांत, सुस्वभावी म्हणून त्यांचा प्रशासन, माध्यम व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच श्री.राजेंद्र सरग यांचा करोना काळातील उत्कृष्ट कामाबद्दल गौरवही करण्यात आला होता.राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यंगचित्रकाराला आपण मुकलो आहोत. त्यांच्या अशा अकाली जाण्याने माहिती व जनसंपर्क विभागाचे निश्चितच अपरिमित असे नुकसान झाले आहे.राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो,अशा शब्दात माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.तसेच सर्वांनीच परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःची, स्वतःच्या कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, जनतेनेही शासन-प्रशासन वारंवार देत असलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.