दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । मुंबई । अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने पाच दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टी गाजवणारा महानायक काळाच्या पडद्याआड गेला. आपल्या अभिनय सामर्थ्याने त्यांनी विविध व्यक्तीरेखा अजरामर केल्या. प्रेमासाठी सर्वशक्तीमान राजवटीविरूद्ध बंड पुकारणाऱ्या ‘सलिम’पासून दारूत स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘देवदास’पर्यंतच्या त्यांच्या अनेक भूमिका कायम स्मरणात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
दिलीप कुमार यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना श्री.चव्हाण म्हणाले की, त्यांचा अभिनय आणि संवाद प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे होते. ‘जो लोग सच्चाई की तरफदारी की कसम कहते हैं, ज़िन्दगी उनके बड़े कठिन इम्तिहान लेती है’ सारखे त्यांचे संवाद वास्तविक आयुष्याशी जवळीक साधणारे असायचे. त्यामुळेच त्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आमचे वडील डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याशी दिलीप कुमार यांचे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने आपण एक महान अभिनेता गमावला आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी दिवंगत अभिनेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.