दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । वृक्षारोपण करताना एक अत्यंत महत्वाची काळजी घ्यावी आणि ती म्हणजे फक्त स्थानिक व किफायतशीर झाडेच लावावीत. कारण आपली स्थानिक जैवविविधता वाचविणे खूप गरजेचे आहे. स्थानिक झाडे लावून नैसर्गिक पुनर्जीवन केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता वाढेल. फलटण तालुक्यामध्ये फरांदवाडी कृषी क्रांती, वृक्ष संवर्धन समिती व इंजिनिअरिंग युनिव्हर्स यांच्या संयुक्त विद्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. तरी सदरील योजनेचा फायदा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन फरांदवाडी कृषी क्रांतीचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी केले.
फरांदवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण व रोपे वाटप कार्यक्रमात भांबुरे बोलत होते. इंजीनियरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटणचे अक्षय अब्दागिरे यांनी तालुक्यामध्ये एक कोटी रोपे अल्पदरात उपलब्ध करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे नियोजन असून देशी वृक्ष लागवडी मुळे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळतो व पुढील पिढीसाठी वृक्ष लागवड गरजेची असल्याचे सांगितले.
तसेच वृक्ष संवर्धन समितीचे उद्धव बोराटे यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषिक्रांती कंपनीचे संस्थापक दत्तात्रय राऊत यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. संचालक कपिल राऊत, श्रीनाथ प्रतिष्ठानचे सचिव व आर्थिक सल्लागार बाळासो राऊत, अरुण राऊत, अनिल नाळे ,दिलीप दळवे, परशुराम शिंदे, विजय शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कपिल राऊत यांनी मानले.