वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.०९ : आताच्या काळात आपल्याला एकीकडे ऑक्सीजनला पैसे द्यावे लागत आहेत तर दुसरीकडे वृक्ष आपल्याला मोफत ऑक्सीजन देत असूनसुद्धा त्यांची निगा आपल्याकडून राखली जात नाही. मात्र इथून पुढच्या काळात आपण सर्वांनी फलटण तालुक्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन ही वृक्षे जगवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वखर्चाने बाणगंगा नदी शेजारील दत्तघाटाच्या पाठीमागे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबालकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, अजय माळवे, नगरसेविका सौ.प्रगती कापसे, सौ.वैशाली चोरमले, सौ.सुवर्णा खानविलकर, सौ.ज्योत्स्ना शिरतोडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

युवा नगरसेवक म्हणून किशोरसिंह नाईक निंबाळकर हे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच अग्रभागी असतात. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करुन त्यांनी सर्व युवकांसमोर उत्तम आदर्श ठेवला असल्याचेही, श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी नमूद करुन किशोरसिंह नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचा निर्णय अतिशय सुत्य असुन आगामी काळामध्ये हेच वृक्ष आपल्या सर्वांना मोफत ऑक्सीजन देणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनीच वृक्ष लागवड व संवर्धन करणे हे अतिशय गरजेचे आहे, असे पांडुरंग गुंजवटे यांनी सांगितले.

कार्यक्रमास राहुल निंबाळकर, अनिल शिरतोडे, सचिन तिवाटणे, पै.पप्पू शेख, अभिजीत जानकर, सनी शिंदे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!