
स्थैर्य, विडणी, दि. ०८ ऑगस्ट : पर्यावरण संवर्धन आणि गावातील हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने, विडणी (ता. फलटण) येथे आज, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘हरित दिशा फाउंडेशन’च्या वतीने भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये शेकडो झाडांची लागवड करण्यात आली.
विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतिलाल अभंग यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात आपले योगदान दिले.
यावेळी सरपंच सागर अभंग, हरित दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन अभंग, माजी सरपंच चंद्रकांत नाळे, गणेश नाळे, दत्तात्रय काळुखे, काका कदम, विनायक घनवट, तानाजी नाळे, दिनेश अभंग यांच्यासह अनेक मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.