लेखणीच्या शिलेदारांना ‘हिरवागार’ सलाम! माळजाई उद्यानात दिवंगत पत्रकारांच्या स्मृती बहरल्या; फलटणमध्ये पत्रकार दिनी अनोखा उपक्रम


फलटणमधील निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार दिनी माळजाई उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या या उपक्रमाने दिवंगत पत्रकारांचा वारसा जपला असून, त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक झाड लावण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 07 जानेवारी : फलटण शहराला आणि तालुक्याला निर्भीड, निस्वार्थी आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा मोठा वारसा लाभला आहे. लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि प्रसंगी शासन व्यवस्थेला धारेवर धरणाऱ्या दिवंगत पत्रकारांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून फलटणमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. येथील माळजाई उद्यानात मागील पिढीतील सुमारे २० ते २५ दिवंगत पत्रकारांच्या नावाने प्रत्येकी एक झाड लावून त्यांना ‘हिरवागार’ सलाम ठोकण्यात आला.

फलटण लायन्स क्लब, माळजाई उद्यान विकास समिती आणि फलटण शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी हा वृक्षारोपण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माळजाई उद्यान विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, माजी लायन्स प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, पत्रकार सुभाष भांबुरे यांच्यासह लायन्सचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी फलटणच्या पत्रकारितेच्या इतिहासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणे असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्य करणे असो, फलटणच्या पत्रकारांनी नेहमीच आपली भूमिका चोख बजावली आहे. कॉ. हरिभाऊ निंबाळकर, शाहू थोरात, बबनराव क्षीरसागर यांसारख्या जुन्या पिढीतील पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांची बांधिलकी जपली. आजच्या पिढीनेही तोच वारसा पुढे चालवत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.”

तसेच, लायन्स क्लबच्या ५८ वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी मुधोजी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अल्पदरातील नेत्रसेवा आणि १ कोटी २५ लाखांच्या अत्याधुनिक मशिनरीच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली.

माळजाई उद्यान विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी उद्यानाच्या कायापालटाची माहिती दिली. ते म्हणाले, “उद्यानातील देवीच्या मंदिराची डागडुजी, रंगरंगोटी, सीसीटीव्ही सुरक्षा, आणि अंतर्गत रस्ते आम्ही पूर्ण केले आहेत. लवकरच वृद्धांसाठी ओपन जिम, नाना-नानी पार्क आणि वॉकिंग ट्रॅक या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.” माजी प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांनी लायन्स क्लब आणि पत्रकारांचे नाते अतूट असून शहराच्या विकासात हे दोन्ही घटक हातात हात घालून काम करत असल्याचे नमूद केले.

यावेळी खालील दिवंगत पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले: माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर (दै. शिवसंदेश), माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (सा. ठिणगी), अनंत उर्फ बबनराव क्षीरसागर (दै. केसरी), वसंतराव पेटकर (सा. जनसेवा), वर्धमान शहा (सा. आदेश), दत्तोपंत देशपांडे (दै. तरुण भारत), शाहू थोरात (ब्लीट्ज), राजाराम देशपांडे (दै. सकाळ), वसंतराव ढवळीकर (दै. प्रभात), दिगंबर देशपांडे (दै. महाराष्ट्र हेरॉल्ड), सुभाषराव निंबाळकर (सा. सुभाषित), व्यंकटेश तथा बापू देशपांडे, सुधीर उंडे, दिलीपराव रुद्रभटे (दै. स्थैर्य), प्रा. रमेश आढाव, दिलीप देशपांडे (सा. योद्धा), विलास साळुंखे, सुरेश गायकवाड (सा. छत्रपती), आर. के. निंबाळकर, राजेंद्र भागवत, भालचंद्र देशपांडे, ॲड. दस्तगीर मेटकरी, रामविलास रणसिंग आणि चंद्रकांत साळवी.

पत्रकार दिनानिमित्त बुधवार दि. ७ आणि गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान) येथे निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद निंबाळकर यांनी केले, तर पत्रकारांच्या वतीने सुभाष भांबुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आर्किटेक्ट स्वीकार मेहता यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!