
दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। सातारा । जागतिक महिलादिनानिमित्त येथील हरित सातारा या पर्यावरणविषयक कामात अग्रेसर असलेल्या संस्थेच्यावतीने अजिंक्यतारा किल्लावरील मंगळाई टेकडीवर महिलांनी वृक्षसंवर्धनाचा जागर केला. यामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिंनीसह तब्बल एक हजार महिलांनी सहभाग घेतला होता.हरित सातारच्यावतीने या कार्यक्रमात महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
पुढील पिढीला ऑक्सिजन मिळण्यासाठी हरित साताराच्यावतीने वृक्षसंवर्धनाचे काम केले जाते. अजिंक्यतार्यावरील मंगळाई टेकडीवर हजारो वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. त्याचे संवर्धन होण्यासाठी दर शनिवारी विविध संस्था व नागरिकांच्या मदतीने वृक्षांना पाणी घालण्यात येते. यासाठी विविध संस्था व मान्यवर स्वखर्चातून पाण्याच्या टँकर उपलब्ध करून देतात. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व वृक्षसंवर्धन कार्यक्रम आयोजन केले.
कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी महिलांना पर्यावरणाच्यादृष्टीने वृक्षसंर्धनाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांना थंड पेयाचे वाटप करण्यात आले. हरित साताराच्यावतीने सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आली. यापुढील अशाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.